स्मरणशक्ती फक्त मेंदूतच नाही का? संशोधन सांगतं की आपल्या शरीरातील पेशी सुद्धा 'स्मरणशक्ती' ठेवू शकतात
आपल्या शरीरात फक्त मेंदूतच स्मरणशक्ती असते असा आपला ठाम विश्वास होता. मेंदूतले न्युरल सर्किट्स आणि मेंदू पेशी आपल्या आठवणी सांभाळतात, असं आपण मानत आलो होतो. परंतु, न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या संशोधनामुळे हा समज खोटा ठरतो आहे. या संशोधनानुसार मेंदू व्यतिरिक्त इतर पेशी देखील स्मरणशक्ती ठेवू शकतात. यामुळे स्मरणशक्तीची व्याख्या बदलली असून शरीरातील इतर अवयव देखील स्मरणशक्तीत सहभाग घेतात हे लक्षात आलं आहे. या महत्त्वाच्या शोधामुळे शिकणे आणि स्मरणशक्तीवर आधारित आजारांच्या उपचारांसाठी नव्या दृष्टिकोनाचा वापर करण्यास मदत होऊ शकते.
स्मरणशक्ती: मेंदूतील फक्त ‘फाइल्स’ नाहीत
आपण साधारणपणे स्मरणशक्तीला फक्त मेंदूशी संबंधित मानतो, जणू मेंदू ही आठवणींची एक ‘फाइल सिस्टीम’ असते. अनुभव-आठवणी मेंदूत साठवल्या जातात आणि नंतर वापरल्या जातात. मात्र, नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की शरीरातील इतर भाग देखील स्मरणशक्ती साठवू शकतात. यामुळे आता स्मरणशक्ती ही मेंदू पुरती मर्यादित नसून शरीराच्या वेगवेगळ्या पेशींमध्येही तिचे अस्तित्व असू शकते.
मेंदूशिवाय इतर पेशी देखील 'स्मरणशक्ती' ठेऊ शकतात का?
न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतील संशोधक डॉ. निकोलाय वी. कुकुश्किन यांच्या नेतृत्वाखालील या संशोधनात मेंदूशिवाय इतर पेशींवर स्मरणशक्तीची तपासणी करण्यात आली. दोन प्रकारच्या पेशींवर - एक नर्व्ह टिश्यूतील आणि दुसरी किडनी टिश्यूतील पेशी - केमिकल सिग्नल्सच्या स्वरूपात एक नवीन स्मरण तयार करण्याचा प्रयोग करण्यात आला. आश्चर्य म्हणजे, या पेशींनी एक 'स्मरणजनक जीन' सक्रिय केला, जो मेंदू पेशींमध्ये सुद्धा शिकताना सक्रिय होतो.
मेंदूपलीकडील स्मरणशक्तीचा प्रभाव
जर मेंदू व्यतिरिक्त इतर पेशींमध्ये देखील स्मरणशक्ती असू शकते तर त्याचा शिक्षण, आरोग्य, आणि आजारांच्या उपचारांवर मोठा परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, पॅनक्रियासच्या पेशींनी पूर्वीच्या ग्लूकोज पातळ्यांची ‘आठवण’ ठेवल्यास रक्तातील साखर नियंत्रण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल. तसेच, कर्करोगाच्या उपचारात देखील बदल होऊ शकतो कारण कर्करोगाच्या पेशींनी पूर्वीच्या केमोथेरपी उपचारांची ‘आठवण’ ठेवू शकतात.